सुन्न एकांतातली खिडकी उघडणे

सुन्न एकांतातली खिडकी उघडणे
आतली गर्दी निहाळत मन रमवणे 

हे खरे की आपले दुर्लक्ष होते 
होत नाही आपला एकांत बघणे 

ज्या क्षणी कळली मला उद्विग्न फडफड
सोडले फुलपाखरू चिमटीत धरणे 

आपल्याही पातळीचा प्रश्न आहे 
जमत नाही आणखी खाली उतरणे

या जगानेही मला विसरून जावे
मग मला साधेल तेव्हा जग विसरणे

ऐन वैशाखातले जणु ऊन्ह होतो 
अन् तुझे येणे असे की सर बरसणे 

यामधे मग रात्रपण संपून जाते 
किर्र अंधारातल्या छाया हुडकणे

आपल्यामध्ये असे का होत नाही 
की जसे पाण्यामधे पाणी मिसळणे 

हाक मारुनही कुणी उठणार नाही
पाहिजे आहे असेही दीर्घ निजणे 

- दास पाटील 

Comments